माणसं अशी कां वागतात?

माणसं अशी कां वागतात?
एकाची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।
नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते बोलतात ।
गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।।

माणसं अशी कां वागतात?
आवडली मुलगी म्हणून लग्न करतात।
थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात ।
जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात ।

माणसं अशी कां वागतात?
दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात ।
सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात ।
पत्नी असली सुंदर, तरी बाहेर लफडी करतात ।।

माणसं अशी कां वागतात?
थोरांच्या पुण्याईने,भले झाले म्हणतात ।
आई वडील असले कीं, रागराग करतात ।
मृत्यूनंतर त्यांच्या, सारे सोपस्कार करतात ।।

माणसं अशी कां वागतात?
नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात ।
चांगले चालले असले कीं, मनातून जळतात ।
मात्र “ऐकून बरे वाटले” वर वर म्हणतात ।।

माणसं अशी कां वागतात?
पाहुणा कोणी आला कीं, “या बसा” म्हणतात ।
‘काय काम काढलं ‘ म्हणून हळूच विचारतात ।
येण्याच्या आनंदापेक्षा – जाण्याची वाट पहातात ।।

माणसं अशी कां वागतात?
दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात ।
इतरांच्या कामी यावे – नेहमीच सांगतात ।
कुणी कांही मागितलं कीं, असून नाहीं म्हणतात ।।

माणसं अशी कां वागतात?
कुठलाही माल उधारीने मागतात ।
चार दिवसांत “पैसे आणून देतो” म्हणतात ।
एकदा घेऊन गेलें कीं तोंड काळे करतात ।।

माणसं अशी कां वागतात?
गया वया करून,पैसे उसने मागतात ।
वेळेवर परत देण्याचा ” वायदा ” करतात ।
एकदा काम झालें कीं, विसरून जातात ।।

माणसं अशी कां वागतात?
समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात ।
नेहमीच आठवण येते “वर वर म्हणतात “।
पत्र,अथवा फोनचा, खर्च मात्र टाळतात ।।

माणसं अशी कां वागतात?
कुणी कधी विचारलं तर,घेत नाहीं म्हणतात ।
फुकटची मिळाली की,भरपूर पितात ।
जेवायचं असलं तरी,भूख नाहीं म्हणतात ।।

माणसं अशी कां वागतात?
माणूस कोणी मेला कीं गळा काढून रडतात ।
गोडवे त्याच्या मोठे पणाचे तोंड भरून गातात ।
मात्र त्याच्या हयातीत,नेहमी शिव्या घालतात ।।

tc
x