X

Weather Update : आज पासून पुढील पाच दिवस महत्त्वाचे! राज्यात सोसाट्याचा वारा गारपिटीची शक्यता

हवामान अंदाजे सरींसह वादळ वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे.

पुणे : पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यापासून प्रतिबंधासाठी सर्वतोपरी तयारीत राहण्याचे आवाहनही हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे. सोसाटय़ाचा वारा, वादळ सदृश परिस्थिती आणि विजांच्या कडकडाटाची परिस्थिती निर्माण झाल्यास बचावासाठी घराबाहेर न पडण्याचा तसेच जलाशय आणि विजेचा धक्का बसण्याचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा, असेही हवामान विभागाकडून सुचवण्यात आले आहे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठाही बंद ठेवण्याबाबतची सूचना भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना आपल्या शेतातील द्राक्ष आणि केळय़ांच्या पिकांना आडोसे देण्याची तसेच कोणत्याही पिकांना सिंचन किंवा रासायनिक खतांची फवारणी न करण्याची सूचना हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंगळवारी (१४ मार्च) मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालातून समोर आले आहे.

कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले, तर उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळ राहिल्याचे दिसून आले. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी येथे तर सर्वात कमी किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस पुण्यात नोंदवण्यात आले आहे. १४ ते १८ मार्च या कालावधीत कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सोसाटय़ाचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मार्चमध्ये पहिल्यांदाच उष्णतेचा प्रभाव दिसून येत आहे. राज्यात पाऊस आणि गारपिटीनंतर आर्द्रता वाढली आहे. दिवसभरात तापमान 30 अंश सेल्सिअस असते. रात्री तापमान 14-15 अंश सेल्सिअस राहते. अशा परिस्थितीत लोकांना दिवसा घाम फुटतो.

हवामान विभागाच्या मते, पुढच्या पाच दिवसांत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.

पुढच्या पाच दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशभरात काही ठिकाणी उष्मा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान कोकण परिसरात दमट वातावरण असल्याने तापमान 35° च्या पुढे गेले आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात आजपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 5:01 am

Davandi: