उन्हाळ्यात कितीही पाणी सेवन केल तरी घसा कोरडा पडल्यासारखं वाटतं. अशावेळी तुम्ही खालील दिलेल्या घरगुती पेयांच सेवन करून तहान भागवण्यासोबतचं उष्माघातापासून स्वत:चं संरक्षण करु शकता.
Summer Drinks : फेब्रुवारी महिन्यातच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. कडक उन्हात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. जास्त घाम येत असल्याने शरीरातील अनेक हायड्रेशन मिनरल्स नष्ट होतात यामुळे डिहायड्रेशन होते. तर उष्माघातामुळे अनेक जण आजारी पडतात. अशा परिस्थितीत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचं सेवन केलं पाहिजे. तसेच कोल्डिंक्सऐवजी तुम्ही आरोग्यदायी घरगुती पेयांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या घरगुती पेयांमुळे उन्हाळ्यात तुम्ही उष्माघातापासून स्वत:चं संरक्षण करु शकता. चला तर मग जाणून घेऊ अशात काही घरगुती पेयांबद्दल…
कैरीचं पन्हं
कैरीचं पन्ह हे आरोग्यासाठी उत्तम पेय आहे. उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी कैरीचं पन्हं भरपूर सेवन केले जाते. कच्चा कैरीपासून तयार होणार हे पेय चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात व्हिटामिन सी, ए, बी१, बी२, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, लोह यांसारखे पोषक घटक आहेत. कैरी, जिरे, पुदिना, मीठ आणि गूळ इत्यादीपासून ते बनवले जाते. त्वचा निरोगी ठेवण्यासोबत आरोग्यासाठी हे गुणकारी आहे.
बेल फळाचं सरबत
गरमीच्या दिवसात शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी बेल फळाचं सरबत एक उत्तम पेय आहे. बीटा-कॅरोटीन, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, बी1, बी2, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध असलेले हे पेय शरीरास ताजेतवाने ठेवते. तसेच याच्या सेवनाने तुम्ही उष्माघातापासून स्वत:चं संरक्षण करु शकता. पचनक्रियेसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते.
सत्तूचं सरबत
उन्हाळ्यात बहुतेक जण शरीराला थंड ठेवण्यासाठी सत्तू सरबत पिणं फायदेशीर मानतात. हे सरबत कॅलरीज, कार्ब्स, प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे. यामुळे उन्हाळ्यात तुम्हा कोल्डिंक्सऐवजी सत्तूचं सरबत पिऊ शकता. हे एनर्जी ड्रिंक असून ज्यातून शरीरास पुरेशी ताकद मिळते.
उसाचा रस
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी अनेकजण उसाच्या रसाचे सेवन करतात. उष्माघातापासून वाचवण्यासाठीही हे सरबत उपयुक्त आहे. तसेच शरीराला शांत आणि थंड ठेवण्यास मदत मिळते. यात लोह, कॅलरी, साखर आणि फायबर आहेत जे डिहायड्रेशन कमी करून आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समतोल ठेवतात.
ताक
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे असेल तर ताक हे एक उत्तम पेय आहे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. ताकामध्ये शरीरीस पुरेश्या कॅलरी, कार्ब्स, फायबर आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासह अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भाजलेले जिरे, काळी मिरी पावडर आणि सैंधव मीठ ताकात टाकून हे सेवन करू शकता.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
This post was last modified on %s = human-readable time difference 8:10 am