ग्रामसभेचे नियम
• ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील.
• प्रत्येक आर्थिकवर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) निदान सहा ग्रामसभा ग्रामपंचायतीस घेण्यास बंधनकारक आहे.
• एका आर्थिक वर्षात सरपंच सहा ग्रामसभापैकी एकही ग्रामसभा घेण्यास चुकल्यास, त्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन, निलंबनास पात्र असेल.
• पहिली ग्रामसभा त्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे आवश्यक आहे.
• ग्रामसभेच्या दोन सभा दरम्यान चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये.
• ग्रामसभेचे पदसिध्द अध्यक्ष सरपंच हे असतील. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल. या दोघांच्या अनुउपस्थितीत ग्रामसभेत उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून निवडलेली एखादी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील.
• ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष यांनी किंवा ते ज्यांना आदेशीत करतील त्यांनीं देणे बंधनकारक आहे.
• ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रिकरण करणे, फोटो काढणे आवश्यक आहे. (शासन परिपत्रकानुसार).
• स्थायी समिती, पंचायत समिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी तसचे राज्यशासन यांच्याद्वारे फर्मावलेली कोणतेही कार्य ग्रामसभा पार पाडील.
• ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा ग्रामसभेच्या नियमित सभेपूर्वी घेण्यात यावी.
• ग्रामसभेसाठी मतदारांची उपस्थिती तसेच, महिलांची उपस्थिती वाढवण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी.
• सरपंचाला स्वतःहोऊन कोणत्याही वेळी ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार असेल. तसेच, स्थायी समिती, पंचायत समितीने किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा राज्य शासनाने ग्रामसभेची मागणी केल्यावर सरपंचास पंधरा दिवसाच्या आत ग्रामसभा बोलावणे अनिवार्य असेल.
• ग्रामसभा, तिच्या पुढील सभेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण तिच्या आगोदरच्या सभेत निश्चित करेल.
• ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी तसेच, गावात काम करणारे शासकीय, निम-शासकीय आणि पंचायतीचे सर्व कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहणे आवश्यक आहे.
• ग्रामस्तरावरील कर्मचारी व अधिकारी जसे की तलाठी, कृषी सहाय्यक, वनपाल, शिक्षक, वायरमन, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक इत्यादींनी ग्रामसभेत उपस्थित राहून त्यांच्या कामाचा आढावा ग्रामसभेस देणे त्यांना बंधनकारक आहे.
• ग्रामसभेस किमान १०० किंवा एकूण मतदारांच्या १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्ती संख्या समजण्यात येईल.
• ग्रासभेचे कार्यवृत्त (विवरण), ग्रामपंचायतीचा संबंधित सचिव (ग्रामसेवक) तयार करील. किंवा त्याच्या अनुउपस्थित सरपंच निदेश देईल त्याप्रमाणे, ग्रामपंचायतीचा कर्मचारी तयार करील.
• ग्रामपंचायत प्रत्येक सहामाहीमध्ये एकदा, विकासकामांवर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेत ठेवील व त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावील.
• ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडलेल्या सर्व बाबींवर चर्चा केली जाईल आणि त्यावर ग्रामपंचायत विचार करील.
ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य
१. गावात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक किंवा आर्थिक योजना, कार्यक्रम व प्रकल्प ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास मान्यता देणे.
२. विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचयतीला देणे.
३. ग्रामसभा राज्य किंवा केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना करिता लाभधारकांची निवड करणे.
४. आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.
५. कोणतीही भूमी संपादन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आपले मत कळवण्याआधी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक आहे.
६. तंटामुक्ती समिती, ग्राम शिक्षण समिती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, लेखा परीक्षण समिती इत्यादी सारख्या समित्या निवडायचे अधिकार ग्रामसभेस असतात.
सरपंच व उपसरपंच मानधन/पगार
दिनांक १ जुलै, २०१९ पासून राज्यातील सरपंचाच्या मानधनात वाढ केली. तसेच, उपसरपंचानाही मानधन लागू केले. उपसरपंचाना यापूर्वी मानधन दिले जात नव्हते.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंच यांना खालीलप्रमाणे मानधन/पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (संदर्भ: शासन निर्णय क्र. व्हीपीएम २०१९/प्र.क. २५५ /पंरा-३).
० ते २००० लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन
सरपंच दरमहा मानधन – ३०००/-
उपसरपंच दरमहा मानधन – १०००/-
शासन अनुदान टक्केवारी – ७५ %
सरपंच अनुदान रक्कम – २२५०/-
उपरपंच अनुदान रक्कम – ७५०/-
२००१ ते ८००० लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन
सरपंच दरमहा मानधन – ४०००/-
उपसरपंच दरमहा मानधन – १५००/-
शासन अनुदान टक्केवारी – ७५ %
सरपंच अनुदान रक्कम – ३०००/-
उपरपंच अनुदान रक्कम – ११२५/-
८००१ व जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन
सरपंच दरमहा मानधन – ५०००/-
उपसरपंच दरमहा मानधन – २०००/-
शासन अनुदान टक्केवारी – ७५ %
सरपंच अनुदान रक्कम – ३७५०/-
उपरपंच अनुदान रक्कम – १५००/-
सरपंच अधिकार व कर्तव्ये
ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषविणे.
• ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
• ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे.
• गावातील विविध गावसमीत्यांचे (तंटामुक्ती, ग्राम शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती इत्यादी) अध्यक्षपद भूषविणे.
• ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजन करून गावाचा विकास आराखडा, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
• ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
ग्रामपंचायतीच्या कर्मचारी/नोकरवर्ग यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
हे पण वाचा :-
🙋🏻♂️ प्रत्येक🏘️ गावांसाठी हे ॲप आताच सविस्तर जाणून घ्या!!
• ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयक मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास असतात.
• ग्रामपंचायतीचे अभिलेख, नोंदवह्या यांची सुव्यवस्था व देखरेख ठेवणे.
• गावातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे.
• शासकीय योजनांचा लाभ वंचित, निराधार, विधवा, परित्यक्तता, अपंग व्यक्तींना मिळवुन देणे.
• महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
• ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश याची सरपंच व ग्रामसेवकाची संयुक्त जबाबदारी असते.
• शासनाच्या कोणत्याही निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे, दाखले आपल्या सहीने आणि पंचायतीच्या मुद्रेनिशी देणे.
• ग्रामपंचायातील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे.
• नेमणूक केलेल्या कर्मचारीला निलंबित, बडतर्फ करण्याचे अधिकार सरपंचास असतात.
• ग्रामपंचायत अधिनियमात प्रदान करण्यात आलेले अधिकार, तसेच पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्य पार पाडण्यासाठी सरपंच हा पूर्णपणे जबाबदार असतो.
• आपली कर्तव्य योग्य रितीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाचे अधिकार सरपंचास असतात. त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देण्यात येते.
ग्रामपंचायत ग्रामसुची
महाराष्ट्र अधिनियम ४५ मधील ग्रामसुचीनुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची असते.
ग्रामसुचीमध्ये पुढीलप्रमाणे घटकांवर सरपंचाला काम करावयाचे असते-
१) कृषी
२) पशुसंवर्धन
३) वने
४) समाजकल्याण
५) शिक्षण
६) वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य
७) इमारती व दळवळण
८) पाटबंधारे
९) उद्योग व कुटिर उद्योग
१०) स्वसंरक्षण व ग्रामसंरक्षण
११) सामान्य प्रशासन
आजच जॉइन करा आपल गाव आपली दवंडी
हर हर दवंडी
घर घर दवंडी