X

केस गळती चे कारणे जाणून घ्या ?

केस अस्वच्छ ठेवणे :

केस चांगले राहण्यासाठी ते स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. तुम्ही तुमचे केस किती वेळा धुवावेत हे खरं तर प्रत्येकाच्या केसांच्या टेक्श्चरवर अवलंबून आहे.

काहीजणांचे केस तेल न लावता ही तेलकट होतात, तर काही जणांचे कोरडेच असतात. पण साधारणपणे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी केस शाम्पूने धुतले पाहिजेत.

केस जर धुतले नाही, तर केसांवरती धूळ बसते. तेलामुळे ती धूळ केसांना चिकटून राहते त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो आणि केसात खाज येते, केस गळतीला सुरुवात होते. केसांची वाढ खुंटते. म्हणूनच केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

केस धुण्यासाठी कंडिशनयुक्त शाम्पूचा वापर केला पाहिजे. नाहीतर केस ड्राय होतात. जर शाम्पू कंडिशन युक्त नसेल, तर केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर जरूर करावा, त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवावेत. ज्यामुळे केसांची चमक चांगली राहील.

जोर लावून केस हाताळणे:

बऱ्याच जणांना केस धूऊन आल्यानंतर ते टॉवेलने खसखस जोरात घासायची सवय असते. तेल लावतानाही टाळूवर हाताने घासायची सवय असते. पण असे केल्याने खरंतर केस तुटतात. म्हणूनच केसांना अत्यंत हळुवारपणे हाताळले पाहिजे.

केस धुतल्यावर केसांमध्ये गुंता होतो, तो काढण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरल्यास केस अलगदपणे मोकळे होतील. जर छोट्या दाताचा कंगवा वापरला तर तो गुंता आणखीन वाढेल आणि केस तुटतील. म्हणूनच कंगवा देखील वापरताना काळजी घेतली पाहिजे.

केसांमधील गुंता काढताना आधी खालच्या केसांपासून सुरुवात करावी. सुरुवातीलाच डोक्यावरून कंगवा फिरवू नये. गरज असेल तेव्हाच केसांवरून कंगवा फिरवावा. उगीच तासातासाला केसातून कंगवा फिरवू नये.

योग्य आहार न घेणे:

कुठलंही सौंदर्य हे आतून यायला लागतं. मग तुम्ही वरून कुठलीही महागडी प्रॉडक्टस वापरलीत तरी त्याचा उपयोग होत नाही.

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी देखील आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या आवश्यक आहाराची गरज असते. काजू, शेंगदाणे, फळे, कडधान्य, धान्ये, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहारात असला पाहिजे.

विटामिन डी, विटामिन बी 12 , झिंक, आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात, केसांची घनता कमी होते.

स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणाऱ्या अधिकतर रक्तस्त्रावामुळे देखील लोहाची कमतरता निर्माण होते. याशिवाय विशिष्ट प्रकारच्या डायटनेदेखील शरीरातील आवश्यक विटामिन्स कमी होतात आणि केस गळती सुरू होते.

बऱ्याच स्त्रियांचे हिमोग्लोबिन देखील कमी असते, त्याच्यामागे देखील आयर्न डेफिशियन्सी हेच कारण आहे. अशा वेळेस खजूर, बीट,गाजर, गूळ यासारखे पदार्थ आहारात घ्यावेतच याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्री विटामिन्स घ्यावेत.

डाय करणे/ स्टाईल करण्यासाठी केसांना उष्णता देणे:
केस जसे पांढरे व्हायला चालू होतात, तसे काहीजण केस काळे करण्यासाठी केसांचा डाय वापरतात. त्याऐवजी जर केसांना नॅच्युरल कलर लावला तर त्याने केसांचे फार नुकसान होत नाही. डायमुळे केसांना अतिरिक्त उष्णता मिळते, जी केसांसाठी हानिकारक असते.

ज्यांचे केस सरळ असतात त्यांना ते कुरळे हवे असतात, तर ज्यांचे कुरळे असतात त्यांना ते सरळ करायचे असतात. केसांना असा आकार देताना त्यांना आवश्यक ती उष्णता द्यावी लागते त्यानंतरच अशी वेगळी हटके स्टाइल करता येते, परंतु यामध्ये आपण आपल्या केसांचे किती नुकसान करतोय याची आपल्याला त्यावेळेस कल्पना येत नाही. त्यामध्ये केस तुटतात आणि गळतात.

केस न कापणे:

बऱ्याच महिलांना लांबसडक घनदाट केस हवे असतात त्यासाठी ते कधीही केसांना कात्री लावायला तयार नसतात. केस कापले नाही तर आपले केस छान लांब होतील असं काहींना वाटत राहतं, पण ही चुकीची समजूत आहे.

जर लांबसडक केस हवे असतील तर केस वरचेवर ट्रिम करायला हवेत. किमान आठ-नऊ आठवड्यात एकदा तरी केसांच्या शेंडा कापल्या पाहिजेत.

पांढरे केस हाताने ओढून काढणे:
आपले पांढरे केस दिसू नयेत याकरिता काहीजण पांढरे केस मुळापासून उपटून काढतात. परंतु यामुळे केसांच्या मुळांना खरंतर धोका निर्माण होतो आणि मग त्या ठिकाणचे केस चांगले वाढत नाहीत त्यांची वाढ कमी होते.

यासाठी पांढरे केस लपवण्याचे वेगवेगळे उपाय आहेत ते केले पाहिजे, पण केस मुळापासून उपटणे हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही.

अनियमित जेवण करणे, नाश्ता टाळणे:
वजन कमी करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या प्रकारचे डायट फॉलो केले जातात. या काही वेगळ्या डायटमध्ये सकाळचा नाश्ता टाळला जातो.

रात्रीच्या जेवणानंतर आणि सकाळच्या खाण्यामध्ये १२ तासांपेक्षा जास्त गॅप पडते. जी एकूणच आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणूनच सकाळचा नाष्टा वेळेत केला पाहिजे असं म्हटलं जातं.

शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्ये त्यातून मिळतील आणि आपले केसही यासाठी अपवाद नाहीत. वेळेवर जेवण करण्यामुळे केसांना योग्य ते पोषणमूल्य मिळतात आणि केस मऊ राहतात. काहीजण किटो डायट करतात, पण त्याचा त्रास आपल्या केसांना होऊ शकतो.

बरेच जण घट्ट पोनीटेल बांधतात. केस ओढून घट्ट वेणी घातली जाते. परंतु यामुळे केसांमध्ये समस्या निर्माण होतात. ज्या मुली लहानपणापासून केस मागे ओढून घट्ट रबराने बांधतात त्यांचे मोठेपणी कपाळाजवळचे केस मागे जातात.

केस बांधायला देखील सॉफ्ट असे हेअर टाय असावे. केसांची क्लिप जर वापरत असाल, तर तीही हेअर फ्रेंडली असावी, जेणेकरून त्या मध्ये केस अडकून तुटू नयेत.

अनेक जण केसांची स्टाईल करण्याकरिता जेल किंवा लोशन केसांना लावतात. परंतु हे जर जास्त काळ केसांवर राहिले तर त्याचा दुष्परिणाम नक्कीच होतो.

अशा केमिकलच्या गोष्टी जास्तवेळ केसांवरती ठेवण्यापेक्षा काही नैसर्गिक ऑप्शन मिळतो का हे पहावे. ज्यामुळे केसांची कमीत कमी हानी होईल याची काळजी घ्यावी.

उन्हात मोकळे केस ठेवणे:

जर आपण कडक उन्हात जाणार असू, तर आपले केस आणि आपलं डोकं हे एखाद्या स्कार्फ ने झाकून घ्यावे किंवा एखादी कॅप डोक्यावर घालावी. कारण कडक उन्हामुळे देखील केसांची हानी होऊ शकते. केसांमधील उष्णता वाढते.

त्याचबरोबर काहीजणांना आपल्या केसांबरोबर खेळण्याची सवय असते. म्हणजे उगीचच केसांमध्ये हात घालून केस फिरवत राहणे. एखादी बट घेऊन तिच्यासोबत खेळणे. यामुळे देखील केसांना कायमचे नुकसान पोहोचू शकते, याची आपल्याला कल्पनाही नसते.

धूम्रपान करणे:
धूम्रपानामुळे केसांना देखील नुकसान होते याची आपल्याला कल्पनाही नाही. धुम्रपानामुळे डोक्याकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि आपल्या केसांना मिळणारे पोषणही त्यामुळे कमी होते.

अतिरिक्त ताण घेणे:

आपल्या जीवनात असणाऱ्या समस्यांमुळे, काम पूर्ण करायच्या मर्यादित वेळेमुळे बऱ्याचदा ताण घेतला जातो. ज्याचा परिणाम आपल्या शरीराबरोबरच आपल्या केसांवरही होतो जास्त ताणामुळे केस पांढरे होतात आणि गळतातही.

ताण टाळण्याचा प्रयत्न शक्यतो केला पाहिजे. त्यासाठी योग्य व्यायाम, आहार आणि मेडिटेशन केलं पाहिजे.

आपल्या केसांमध्ये काही बदल होतोय याची जाणीव झाल्याझाल्या त्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. बऱ्याच महिलांना असं वाटतं, की आपलं वय जसे वाढत आहे तसे आपले केस कमी होत आहेत, म्हणून बऱ्याचदा केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, मग केसांच्या समस्यांवरती उपचार करायलाही उशीर होतो.

म्हणूनच जर बदल जाणवला, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. केसांमध्ये बदल होतोय याचाच अर्थ तुमच्या शरीराला काहीतरी सांगायचे आहे.

काहीतरी नको असलेला बदल आपल्या शरीरात होतोय म्हणून आपले केस गळत आहेत याची जाणीव ठेवायला हवी आणि केसांची काळजी घ्यायला हवी.