Ramdas Swami Punyatithi:सकारात्मक दृष्टिकोनासाठी समर्थ रामदास स्वामींचे विचार

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. अनेक महान संत-महंतांच्या शिकवणीतूनच महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण झालेली आहे.समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. दासबोध पासून ते मनाचे श्लोक यांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, स्वामीनिष्ठा यांच्या शिकवणीतून महाराष्ट्राचे प्रबोधन करणार्‍या रामदास स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस आज (१५ फेब्रुवारी) आहे. महाराष्ट्रामध्ये समर्थ संप्रदायाची सुरूवात करणार्‍या रामदास स्वामींचे विचार येणार्‍या पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्याला ते जोपासायला हवे.
संत रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावात झाला होता.सूर्य देवाचे उपासक असलेल्या रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात मारूतींची स्थापना करून व्यायामशाळांना सुरूवात करत व्यायाम करण्यासाठीही प्रेरणा दिली.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती
समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींरची देवळे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे:
(१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर)
(२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे)
(३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर)
(४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ
(५) उंब्रज मारुती (ता. कराड)
(६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ)
(७) मसूर मारुती (ता. कराड)
(८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली)
(९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली)
(१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर)
(११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर)ही ती गावे होत.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले –
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की –
प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।
याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
‘येक म्हणजी मऱ्हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्‍ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’
रामदास स्वामींचे श्रीमनाचे श्लोक
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
असे एकूण २०५ श्लोक आहेत.
समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट
• जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
• समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
• श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)
• श्री राम समर्थ (चित्रपट, दिग्दर्शक संतोष तोडणकर)

पहा रामदास स्वामी यांचे विचार

• आळसे सुख मानू नये। चाहाडी मनास आणू नये॥ शोधल्याविण करू नये। कार्य काही॥
• जो व्यक्ती अधर्म करतो, बेईमानीने पैसा कमावतो, अविचारी असतो तो मूर्ख असतो.
• कोणाच्याही उपकारामध्ये फार काळ राहणं टाळा. जर कधी उपकार घ्यायची वेळ आलीच तर त्याची जाण ठेवून त्यामधून उतराई होण्याचाही वेळीच प्रयत्न करा.
• ज्यांनी आपल्याला कधीही त्रास दिला नाही त्यांना कळत नकळतही दुखावणं टाळा.
• गरीबीतून श्रीमंतीकडे जाणारा व्यक्ती जर परिस्थिती सुधारल्यावर जुन्या नात्यांना विसरला तर तो कायमच गरीब राहणार.
• कोणत्याही रस्त्यावरून चालताना तो मार्ग नेमका कुठे जातो याची माहिती एकदा नक्की करून घ्या.
• केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे
संत रामदास हे स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांसोबत होते. तसेच ते तुकाराम महाराजांचे समकालीन होते.

tc
x