फेरीवाल्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; काय आहे पीएम स्वानिधी योजना
काय आहे पात्रता, कसा करू शकता अर्ज जाणून घ्या सविस्तर
केंद्र सरकार नेहमीच उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते. (PM SVANidhi Scheme) अनेक लोकांना व्यवसाय करायचा असतो. परंतू पैशा अभावी अनेकांना व्यवसाय करता येत नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या योजनेमुळे अनेकांना व्यवसाय करण्यासाठी सरकार भांडवल उपलब्ध करुन देणार आहे. काय आहे सरकारची योजना पाहूया.
फेरीवाल्यांसाठी योजना –
पीएम स्वानिधी योजनाअंतर्गत, सरकार फेरीवाल्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देते. सरकारने ही योजना विशेषत: रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केली आहे. ज्यात भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि लहान फास्ट फूडची दुकाने लावणाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या हमीची गरज नाही. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.
50 हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे –
केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. त्यामुळे या योजनेंतर्गत सर्वप्रथम, कोणालाही 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.
रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या योजनेचे बजेट वाढवले होते. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज केला जाऊ शकतो आणि अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.