बीड : भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंडे मुख्य मार्गदर्शक असलेल्या आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) संचालक असलेल्या परळी येथील दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात नोटीस बजावली आहे.
त्यामुळं पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बीडच्या वैद्यनाथ बँकेला स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस
नेमकं प्रकरण काय?
कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप वैद्यनाथ बँकेवर करण्यात आला असल्याचे या नोटीसात म्हटलं आहे.
दरम्यान, वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ रा.
आर्य समाज मंदिराजवळ, परळी यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती.
तक्रारीचे अर्ज आल्याने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार तपासाचा भाग म्हणून, दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, ही नोटीस 24 जानेवारीला पाठवण्यात आली आहे, तर 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान यावर वैद्यनाथ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हे प्रकरण आधीच उच्च न्यायालयात सुरु आहे. परळी शहर पोलिस ठाण्यातही संबंधितांनी तक्रार दिली होती.
तेथे आम्ही आमची बाजू मांडलेली होती. आता 31 जानेवारीला आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही आमचे म्हणणे सादर करू असे विनोद खर्चे म्हणाले आहेत