“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान!
पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात मिश्किल विधान केलं आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात मिश्किल विधान केलं आहे. आपण जगात कुणालाच घाबरत नाही, पण मी माझ्या मुलाला खूप घाबरते, असं विधान केलं आहे. मुलाला घाबरण्यामागची काही कारणंही पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितली आहेत. त्यांनी बीडमधील एका जाहीर कार्यक्रमात हे विधान केलं असून या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंकजा मुंडे यांनी उपस्थित तरुणवर्गाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाल्या की, “मी या लोकांसाठी काहीतरी करावं, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आज लोकांच्या डोळ्यात जो आनंद, स्वप्न, उत्साह आणि शक्ती आहे. हीच शक्ती, आनंद आणि उत्साह अजून दहा वर्षांनी असाच राहावा, असं काम आम्ही समाजात करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्याकडे पाहून मला फार भीती वाटते, एक भीती अशी वाटते की, आपण फार म्हातारे झालो आहोत. माझे १०-१२ केस पांढरे झाले आहेत. तुमच्या वयात मीही सडपातळ होते. आता वजन वाढलंय, म्हातारी झाली.”
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “माझा मुलगा २१ वर्षाचा आहे, त्यामुळे मला कळत नाही की तुमच्याशी कसं बोलावं. त्याला बोलताना पण मी खूप घाबरते. या जगात मी कुणालाच घाबरत नाही, पण माझ्या मुलाला ‘आर्यामन’ला मी खूप घाबरते. कारण तुमची बुद्धी एवढी तीक्ष्ण आणि तीव्र आहे की, त्यामुळे तुमच्यासोबत वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो. तुमच्या उत्तरामुळे आम्हीच बुचकाळ्यात पडतो. त्यामुळे आम्हालाच प्रश्न पडतो की, आता याला काय उत्तर द्यायचं. त्यामुळे तुमच्यासमोर येणं माझ्यासाठी फार आनंदाची, अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे.”
This post was last modified on %s = human-readable time difference 4:55 am