X

Health news Tech Care: साथीचे आजार रोखण्यासाठी आपण काय करावे? काय केले पाहिजे पहा सविस्तर

मागील चार वर्षांमध्ये हिवताप वगळता मुंबईमध्ये साथीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून धूम्रफवारणी, डासाची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे यांसारख्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र तरीही दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. पावसाळ्यातील साथींचा प्रादुर्भाव वाढण्यास नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या पार्श्वभूमीवर आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

चार वर्षांमध्ये साथीचे आजार कसे वाढले? पहा सविस्तर
मुंबईमध्ये २०२० साली साथीच्या आजारांचे ८ हजार २३२ रुग्ण सापडले, तर १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये रुग्णसंख्येत वाढ होऊन ती ९ हजार ८३४ वर पोहोचली आणि १३ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ११ हजार ८८९ रुग्ण आढळले तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. १ जानेवारी ते ३० जून २०२३ या सहा महिन्यांमध्येच ११ हजार ७०५ रुग्ण आढळून आले असून एकाच्या संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गॅस्ट्रो, डेंग्यू, कावीळ, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गॅस्ट्रोचे २०२० मध्ये २ हजार ५४९, २ हजार ०२१ मध्ये ३ हजार ११०, २०२२ मध्ये ५ हजार ५३९ आणि चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत ७ हजार ९२१ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे अनुक्रमे १२९, ८७६, १ हजार १२३ आणि ७०९ रुग्ण सापडले आहेत. लेप्टोच्या रुग्णसंख्येत मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली. २०२२ आणि २०२३मध्ये स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या ३०० पार गेली आहे. काविळीच्या रुग्णसंख्येतही सातत्याने किंचित वाढ होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

डासांची पैदास कशी होते?
हिवतापाचा प्रादुर्भाव ‘ॲनाफिलीस’ डासामुळे, तर डेंग्यूचा प्रादुर्भाव ‘एडीस इजिप्ती’ डासामुळे होतो. या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते. जुलै-सप्टेंबर या कालावधीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या पाण्यावर ‘ॲनाफिलीस’ आणि ‘एडीस इजिप्ती’ डास अंडी घालतात. पाण्यात डासांच्या अळी तयार होऊन त्याचे कोषामध्ये रुपांतर होते. त्यानंतर सात दिवसांमध्ये यातून डासाची उत्पत्ती होते. या डासांनी माणसाला डंख मारल्यास हिवताप व डेंग्यूचा प्रसार होण्यास सुरुवात होते.

लेप्टोची लागण अशी होते?
लेप्टो हा आजार लेप्टोस्पायरा जंतूच्या संसर्गामुळे होते. हे जंतू उंदीर, घुशी, कुत्रे, मांजर, डुक्कर, शेळ्या-मेंढ्या अशा चतुष्पाद प्राण्यांच्या शरीरात आढळतात. त्यांच्या मूत्रातून लेप्टोस्पायरा बाहेर पडतात. लेप्टोस्पायराचे जंतू असलेले प्राण्यांचे मूत्र पावसाच्या साचलेल्या पाण्यात मिसळले आणि त्यातून चालत जाणाऱ्या व्यक्तीच्या पायावरील जखमांमधून हे जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर त्याला लेप्टोस्पायरोसिसची लागण होते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला लेप्टोची तात्काळ लागण होते. लेप्टोच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यावर साधारणपणे तीन ते २१ दिवसांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागतात. डॉक्सिसायक्लीन गोळ्यांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते. पण हलगर्जीपणा व योग्य वैद्यकीय उपचारांचा अभाव यामुळे रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

३ आणि ४ जुलै या दोन दिवसांची सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद; तापमान वाढीची कारणे काय?

डासांच्या उत्पत्तीकडे दुर्लक्ष कसे होते?
झाडाची कुंडी व त्याखाली ठेवलेली ताटली, फ्रिज व ए.सी.मागील ट्रे, घरातील ड्रम, टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे इत्यादी भंगार साहित्य यामध्ये पाणी साचते आणि ती डासांची उत्पत्तीस्थाने बनू शकतात. घर किंवा सोसायटीच्या आसपास प्रामुख्याने अशी अनेक उत्पत्तीस्थाने आढळतात. अनावश्यक साहित्य नष्ट करणे, त्यात पाणी साचू न देणे अशी काळजी नागरिकांनी घेणे आवश्यक असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष होते. महापालिकेकडून वारंवार सूचना करूनही अनेक घरांमधील कुंडीखालील ताटल्या, फ्रिज व ए.सी.मागील ट्रे स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष होते. ड्रम, पाणी साठवून ठेवलेली भांडी झाकून ठेवली जात नाहीत. ही भांडी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ धुवून कोरडी करणे आवश्यक आहे. गच्ची व अन्य परिसरातील भंगाराची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच डासांची पैदास होते आणि त्यांचा प्रादुर्भाव वाढतो.

This post was last modified on %s = human-readable time difference 4:58 am

Categories: आरोग्य
Davandi: