
Devendra fadvnis wardha
डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, वाढवण-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करु देऊ आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच ३०० युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यामधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी सांडव्याद्वारे नव्याने ५५० कि.मी.ची नदी तयार करण्यात येणार आहे.
यासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठीच्या सर्व मंजुरी देण्यात आल्या असून योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षा अखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह १० ई – लोकार्पण व भूमिपूजन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारततीचे लोकार्पण झाले आणि १० महत्त्वाचे ई लोकार्पण व भूमिपूजनही झाले.
त्यांनी आर्वी उपसा सिंचन योजनेचे ई-लोकार्पण, गांधी विद्यालय आर्वी येथील नवीन इमारतीचे ई-लोकार्पण,आर्वी शहरातील नवीन स्विमींग पुलचे ई-लोकार्पण, आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे ई-भूमीपूजन,आर्वी शहरातील सारंगपूरी तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण ई-भूमीपूजन, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील शंभर खाटाच्या रुग्णालयाच्या इमारतीचे ई-भूमीपूजन, पंतप्रधान सुर्यघर मोफत विज योजनेचे ई-लोकार्पण (सौरग्राम नेरी मिर्झापुर, तह- आर्वी), एमआयडीसीमध्ये कार्यांवित एचएएम टप्पा-२ अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे ई-भूमीपूजन आणि १०० दिवसाच्या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा शासकीय वाहनांचे लोकार्पण केले.
कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..