पॅन, आधार कार्डचा जपून वापर करा
काही महिन्यांपूर्वी एका कंपनीत देवेंद्र कुमारनं आपलं आधार कार्ड व पॅन कार्ड दिलं होतं!
अरे बापरे! बेरोजगार बांधकाम मजुराला आली २१ लाखांची जीएसटी नोटीस!
आपल्या नावावर एक नव्हे तर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या असल्याची खबर एका बेरोजगार व्यक्तीला लागली आणि त्याला धक्का बसला. त्याहून मोठा धक्का त्याला हातात पडलेल्या २४ लाख ६१ हजार रुपयांच्या जीएसटी बिलामुळे बसला. या सगळ्यामुळे प्रचंड गोंधळलेल्या २२ वर्षांच्या देवेंद्र कुमारनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली व्यथा पोलिसांसमोर मांजली. पोलिसांनी कुमारच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आता तपास सुरू केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
नेमकं घडलं तरी काय?
देवेंद्र कुमार उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरचा रहिवासी आहे. मार्च महिन्यात देवेंद्र कुमारला २४ लाख ६१ हजार रुपयांच्या थकित जीएसटीची नोटीस आली. पेशानं बांधकाम मजूर असणाऱ्या देवेंद्र कुमारला लाखो रुपयांच्या जीएसटीची नोटीस आल्यामुळे धक्काच बसला. गेल्या सहा महिन्यांपासून कुमार बेरोजगारच आहे. पण तरीदेखील तुमच्या नावे १ कोटी ३६ लाख रुपये उलाढाल असणारी कंपनी आहे, असा दावा करणारी नोटीस त्याच्या हातात पडली. कुमारसाठी आणखी मोठा धक्का म्हणजे त्याच्याच पुढच्या महिन्यात त्याच्या हातात दुसरी नोटीस पडली. या नोटीसमध्ये त्याच्यानावे १ कोटी १६ लाख रुपये उलाढाल असणारी आणखी एक कंपनी असल्याचं नमूद होतं!
साताऱ्यातील फलटणमध्ये पिता-पुत्राचा काढा प्यायल्याने मृत्यू?
दरम्यान, आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आल्याचा संशय कुमारला आहे. कुमार म्हणतो, “मी फार गरीब आहे. आधी मी नरौरा भागात एका गृहनिर्माण प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होतो. मला मोठ्या कष्टानं दिवसाला ३०० रुपये मिळायचे. पण आता तर माझ्याकडे ते कामही नाहीये. मग मी इतक्या मोठ्या कंपन्यांचा मालक कसा असू शकतो?”
फक्त FIR नोंद करण्यासाठी ४० हजारांचा खर्च!
कुमारनं दावा केला आहे की फक्त एफआयआर नोंदवण्यासाठी त्याला ४० हजारांचा खर्च आला आहे. “सरकारी अधिकारी मला वारंवार या ऑफिसातून त्या ऑफिसात पाठवत आहेत. गाझियाबादहून नोएडा आणि इथून बुलंदशहर असा माझा प्रवास चालला आहे. साधं माझ्या घरातून बुलंदशहरच्या पोलीस स्थानकात यायचा खर्चही खूप जास्त आहे”, अशी व्यथा कुमारनं मांडली आहे.
कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा कुमारला संशय आला
कुमारच्या मते दोन वर्षांपूर्वी तो नोएडाच्या पॅकिंग कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता, त्या कंपनीतील लोकांनी त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कंपनी उभी केली आहे. “तिथल्या कंत्राटदारानं माझं पॅनकार्ड आणि आधारकार्ड पगारासाठी घेतलं होतं”, असं कुमार सांगतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.