BREAKING NEWS : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास ….

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन
१६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला, तर आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्‍या विविध मागण्‍यांसाठी बेमुदत संप पुकारला असून विद्यापीठाच्‍या परीक्षांच्‍या कामकाजावर परिणाम होण्‍याचे संकेत आहेत.

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

👀 अन्यथा परीक्षा बंद
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या पाश्वभूमीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांवर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला कळविले आहे. प्रशासनाने या परीक्षा विनाअनुदानित तत्वावरील कर्मचाऱ्यांकडून पार पाडू नये. अन्यथा आम्ही परीक्षा बंद पाडू. सरकारने आमचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावे. शासनाने आमचे प्रश्न न सोडविल्याने आम्ही आंदोलन करत आहोत, अशी माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वैभव रोडी व सचिव संतोष कानडे यांनी दिली आहे.

👉 आश्वासित प्रगती योजना सुरू करावी, सातव्या वेतन आयोगातील तीनही लाभातील योजनेचा लाभ मिळावा, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी, २००५ नंतर सेवेत असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात १५ फेब्रुवारीला विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला, तर आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्‍यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील कामकाज ठप्‍प पडले आहे.

सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करून जुनी योजना लागू करा, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार दहा:वीस:तीस वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना लागू करा, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा­ऱ्यांना जुनी पेन्‍शन योजना लागू करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे.

आज ‘नुटा’चे अध्‍यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी विद्यापीठ परिसरात संपकर्त्‍या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित केले. स्थानिक पातळीवर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख आणि ऑफीसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे.

tc
x