विषय :—- आई
आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती! ती ईश्वराचे दुसरे रूप असते. देव सगळीकडे पोहचू शकत नाही म्हणून त्याने पृथ्वीवर आई च्या रुपात जन्म घेतला.
बाळ जेव्हा जन्मते तेव्हा बाळ रडते व आई हसते. नंतर बाळ जेव्हा रडते तेव्हा आई कधीच हसत नाही .
जन्म झाल्यावर नाळ जरी कापली तरी वात्सल्याची नाळ कधीच तुटत नाही. बाळाचे बोबडे बोल फक्त आईच समजू शकते. बाळाला जरा सुद्धा बरं नसले तरी आईच्या मनाची एवढी तगमग होते की ती रात्र भर त्याच्या उशाशी जागत बसते.
आईच्या वात्सल्याच्या पुढे अलंकाराची चकाकी फिकी पडते. इतके तेज तिच्या प्रेमळ डोळ्यात दिसते. व्याकरणाला अलंकाराची जोड लागते, पण आईच्या ममत्वाला कसलीच तोड नसते.
बकुळीच्या फुलांचा सुगंध जसा सुकल्यावर ही दरवळतो. त्या प्रमाणे तिच्या मायेचा ओलावा तिच्या पश्चात
ही स्मरणात राहतो.
आईकडे वात्सल्याचे अमृत कुंभ असते ते अमृत बाळाला मायेची संजीवनी देत असते. तिची माया म्हणजे अखंडित वाहणारा प्रेमळ झरा असतो. आपल्याला रागावल्यावर हळूच डोळे पुसते नंतर माया लावून जवळ घेऊन प्रेमाने समजावून सांगते.
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी ती अहोरात्र झटत असते. बाळ हा मातीचा ओला गोळा असतो. त्याच्या ओल्या मनावर चांगले संस्कार करून ती त्याला संस्कारक्षम बनवते.
बाळाच्या प्रत्येक यशामध्ये आईचा मोठा वाटा असतो. त्याची शाळेतील प्रगती पाहून सर्वात जास्त आनंद तिलाच होतो.
बाळाच्या पुढील आयुष्यात आईच्या संस्काराची शिदोरी त्याला यशस्वी वाटचालीसाठी उपयोगी पडते. आई जेवढे त्याचे कोडकौतुक करते, तेवढेच तो चुकल्यावर त्याला चांगलेच फटकारते. त्यामुळे तो आयुष्यात अशा चुका पुन्हा करत नाही.
कारुण्यसिंधु आई ! प्रेमस्वरूप आई! किती वर्णु महती?
आभाळाचा कागद व अश्रूंची शाही करून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी शब्द अपुरे पडतील.
तिन्ही जगाचे स्वामी आई विना भिकारी!
काही वीर माता देशाच्या रक्षणासाठी आपला पुत्र देतात अश्या मातेची थोरवी किती अणि कशी वर्णावी? जर आईने मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडवले तर शिवाजी सारखे देशभक्त जन्माला येतात.
मुले नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करतात. ज्या घरत परोपकार वृत्ती असते त्या घरात मुलाला त्याचे बाळकडू पाजले जाते अणि मग मुले साने गुरुजी च्या पुस्तकातील शाम च्या आई सारखी नावारूपाला येतात.
देवकी ने जन्म दिला यशोदा मातेने वाढवलं. नटखट कान्हा च्या खोड्या गोपी सांगत येत होत्या. तेव्हा यशोदा माता त्याला मुसळला बांधून ठेवायची.
अश्या चुकीच्या वर्तनाला आई पाठीशी न घालता शिक्षा देते. पण चांगले कार्य केल्यास आई त्याचे गुणगान करते. शाबासकीची थाप मुलांच्या पाठीवर पडली तर त्यांच्या मनाला एक उभारी येते.
स्त्री जर संस्कारक्षम असेल तरच ती आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकते. म्हणुन म्हणतात ” जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी “!
प्रसंगी कठोर होऊन वडीलांन प्रमाणे त्याच्या पंखांना बळकटी देऊन उंच भरारी घेण्यासाठी साहाय्य करते. देवाकडे त्याच्या उज्वल भविष्याची मनोकामना करते.
माझे आयुष्य माझे सुख बाळाच्या पदरी घाल त्याला कधीच दुःख काय असते हे कळू देऊ नकोस. नेहमी तुझा वरदहस्त त्याला लाभू दे ! हिच ईश्वर चरणी प्रार्थना ती देवाकडे करत असते.
जेव्हा मुलांची सगळी स्वप्नं सत्यात उतरतात तेव्हा तिच्या एवढा आनंद दुसरा कोणालाच होऊ शकत नाही.
आपल्या सर्वांना माकडीणीची गोष्ट माहीत आहे का? माकडीण माकडाला म्हणते तुझ माझ्या वर खरचं प्रेम आहे तर तुझ्या आईच काळीज आणून दे.
मग माकड आईकडे जातो व तिला सर्व हकिगत कथन करतो, तेव्हा आई त्याला आपल काळीज काढून देते.
मग तो ते काळीज आपल्या प्रेयसीला देण्यासाठी नेत असतो तेव्हा त्याला ठेच लागते व तोंडातून आई गं… असअसे विव्हळणारे शब्द बाहेर पडतात आणि लगेच काळजातून काळजीने आई विचारते, “लागले नाही ना बाळा?”
अनंतात विलीन झाल्यावर देखील माया करणारी एकमेव आईच असते.
भौतिक सुख विकत घेता येते पण आईची माया कुठेही कोणी देऊ शकत नाही. आईची माया इतकी असते की जुन्या साडीची तिने शिवलेली गोंधडी घेऊन झोपलो तरी मायेची ऊब मिळते.
कितीही केले तरी आपण सात जन्मात आईचे ऋण फेडू शकत नाही. अशी आईची महती जग सांगती……
‘
सौ. रोहिणी अमोल पराडकर