Agniveer Recruitment : भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात
भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (३ फेब्रुवारी) भारतीय सैन्यदलाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती.
या जाहिरातीनुसार सैन्यात भरतीसाठीचे तीन टप्पे असतील. अनुक्रमे कॉमन एंट्रन्स टेस्ट, फिजिकल फिटनेस टेस्ट टेस्ट आणि मेडिकल (वैद्यकीय) टेस्ट अशा तीन टप्प्यांमध्ये ही परिक्षा होईल.
यापूर्वी जी भरती प्रक्रिया होती त्यानुसार सर्वात आधी उमेदवारांची फिजिकल फिटनेस टेस्ट होत होती. त्यानंतर त्यांची मेडिकल म्हणजेच वैद्यकीय चाचणी केली जायची. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात उमेदवारांना सीईई म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच लेखी परिक्षा द्यावी लागत होती. आता भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. नव्या बदलांनुसार सर्वात आधी लेखी परिक्षा होईल. त्यानंतर फिटनेस टेस्ट होईल. या दोन चाचण्यांनंमतर वैद्यकीय चाचणी होईल.
आतापर्यंत १९,००० अग्निवीर भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत. तर २१,००० अग्निवीर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सैन्यात दाखल केले जातील. त्यानंतर ४०,००० अग्निवीरांची निवड सैन्यदलात होईल. य़ावेळी नवीन भरती प्रक्रिया लागू केली जाईल. म्हणजेच आगामी ४०,००० अग्निवीर हे नवी भरती प्रक्रिया पार करून भारतीय सैन्यात दाखल होतील.
Agniveer Recruitment : भरती प्रक्रिया का बदलली असेल?
भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी लागणारा मोठा प्रशासकीय खर्च आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनाचा विचार करता भरती पक्रियेत बदल करण्यात आला आहे.
आधीच्या प्रक्रियेनुसार मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदरावांचं स्क्रीनिंग केलं जात होतं. यामुळे प्रशासनावरील दबाव वाढत होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बळ तैनात केलं जात होतं. तसेच भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी देखील उपस्थित असतं. नवीन भरती प्रक्रियेमुळे भरती मेळाव्यांवरील खर्च खूप कमी होणार आहे. तसेच प्रशासकीय आणि लॉजिस्टिक भार कमी होईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 11:55 am