अखिल हिंदुस्थानचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस शिवजयंती म्हणूनही ओळखला जातो, या जयंतीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शिवाजी महाराज हे पहिले छत्रपती आणि अखिल मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सर्वत्रच लोक शिवाजी महाराजांनी राष्ट्रासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करतात. यावर्षी, भारत १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती साजरी करेल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२३ जवळ येत आहे, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तारीख, उत्सवाचा इतिहास आणि महत्त्व माहिती असला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा इतिहास
महात्मा फुले हे महाराष्ट्रातील थोरसमाजसुधारक होते, ज्यांनी १८७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास सुरुवात केली आणि नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुढे सुरु ठेवली. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती मराठी शालिवाहन हिंदू कॅलेंडर फाल्गुन कृष्ण पक्ष ३, १५५१/जुलियन फेब्रुवारी १९, १६३० रोजी झाला होता. ऐतिहासिक नोंदीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज फक्त १६ वर्षांचे असतानाच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता आणि वयाच्या १७ व्या वर्षी रायगड आणि कोंढाणा यांसारखे किल्ले ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांनी प्रशासनात आणि दरबारात मराठी व संस्कृतच्या वापरास चालना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे महत्त्व
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे लोकांसाठी खूप वेगळे महत्त्व आहे म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी शहाजी भोसले होते आणि ते भोसले घराणे मराठा वंशाचे होते. महाराज सर्वात महान मराठा शासक मानले जातात. महाराजांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही सल्तनतीपासून आपल्या मराठा साम्राज्याचे रक्षण केले ज्यामुळे मराठा साम्राज्याची सुरुवात झाली आणि ते वाढतच गेले. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
दरम्यान, शिवजयंतीच्या दिवशी लोक त्यांच्या शौर्याचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करतात. शिवजयंतीच्या दिवशी, संपूर्ण महाराष्ट्रात अगदी जल्लोषात मिरवणुका काढल्या जातात आणि लोक महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे वर्णन करणारी नाटके दाखवतात,याबरोबरच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात.