औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेच्या (Tenth-twelfth examination) उत्तरपत्रिका तपासणीसाठी (Answer sheet inspection) आल्यावर त्या न तपासताच किंवा गठ्ठे अथवा पार्सल परत केले तर त्या शिक्षण संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे (Anil Sable) यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. वेळेत निकाल जाहिर करणे, यासाठी हे आवश्यक आहे. जर तपासणीसाठी पार्सल न घेता मंडळाकडे संबंधित पाठवले, तर त्यांची मंडळ मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीनं घेण्यात असलेल्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC)परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू होते. बऱ्याचदा दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यावर शिक्षक बहिष्कार घालतात. किंवा काही शिक्षकपेपर तपासणी टाळण्यासाठी अनेक सबबी सांगत असतात. सबबी सांगून उत्तरपत्रिका न तपासताच परत पाठवतात. त्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण होते. अशा कामचुकार शिक्षकांमुळे अन्य पेपर तपासणाऱ्या शिक्षकांवर कामाचा मोठा ताण येतो. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्यावर त्या न तपासताच किंवा गठ्ठे अथवा पार्सल परत केले तर त्या शिक्षण संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असा आदेश औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने काढला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, अनिल साबळे यांनी सांगितले की, बऱ्याचदा बोर्डाचे पेपर जसे-जसे होतात. तसे-तसे आपण पेपर शिक्षकांना तपासणीसाठी देतो. वेळेवर निकाल लागावा, हा त्याचा उद्देश आहेच. मात्र, यापूर्वी राज्य मंडळाचा असा आक्षेप होता की, औरंगाबाद विभागामुळे राज्याचा निकाल उशीरा लागतो. मात्र, आता तसं होऊ नये आणि औरंगाबादला लागलेला हा कलंक पुसून निघावा, म्हणून आम्ही एक पत्रक काढले.
त्यात असं सांगितलं की, शिक्षकांनी कुठलीही कारणं देऊ नये. शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासताच परत पाठवू नये. शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासताच परत पाठवल्या तर सदर, शाळा-महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल.