मनोज जरांगे सांगतात, “राज ठाकरेंनी आमच्याकडून काही मुद्दे लिहून घेतल्या. तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत…!”
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले असून त्यांना आंदोलकांचा वाढता पाठिंबा पाहाता राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. याआधी शरद पवार, उद्धव ठाकरे व गिरीश महाजन यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
हे ही वाचा:- फडणवीसांचा राजीनामा मागण्याचा ‘त्यांना’ नैतिक अधिकार नाही; मंत्री विखे पाटील
यावेळी त्यांनी आंदोलकांच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंशी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत माध्यमांना माहिती दिली. पहा व्हिडिओ
काय म्हणाले मनोज जरांगे जाणून घ्या?
मनोज जरांगे यांनी आधी राज ठाकरेंचा संभ्रम झाल्याचं सांगितलं. “सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणामुळे आरक्षण मिळू शकत नाही असा राज ठाकरेंच्या म्हणण्याचा अर्थ होता. त्यांचा अर्थ होता की तुम्हाला फक्त झुलवत ठेवतील. त्यांचं बरोबर आहे. पण आमची मागणी सर्वोच्च न्यायालयातल्या आरक्षणाची नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर वर्षभराने आम्ही अखंड महाराष्ट्रात सहभागी झालो. त्याआधी आम्हाला आरक्षण होतं. त्यासाठी हा लढा आहे. आम्ही नेमकं कोणतं आरक्षण मागतोय हे राज ठाकरेंना सांगितल्यानंतर ते सकारात्मक झाले. सर्वोच्च न्यायालयातल्या प्रलंबित आरक्षणासाठी आमची मागणी नाही. मराठवाडा वर्षभरानंतर अखंड महाराष्ट्रात सहभागी झाला. हैदराबाद संस्थानात असताना आम्हाला आरक्षण होतं. आम्हाला ते आरक्षण लागू केलं नाही ही आमची भूमिका आम्ही त्यांना सांगितली”, असं जरांगे-पाटील म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाशी आमचा संबंध नाही”
“मराठ्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावेत म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही”, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
“मराठवाड्याच्या जालन्यातील काही तालुक्यात मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. गिरीश महाजन म्हणाले की जीआर काढण्यासाठी आम्हाला पुरावा पाहिजे. समितीला आज पुरावे मिळाले आहेत. हे आम्ही राज ठाकरेंना सांगितलं. राज ठाकरेंनी आमच्याकडून काही टिप्स लिहून घेतल्या. तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवतो. कारण हा विषय मलाच माहिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला काही खोटं सांगत नाही असं ते म्हणाले”, असंही ते म्हणाले.