मॅट्रिमोनिअल वेबसाईट वरती ऑनलाईन लाइफ पार्टनर शोधताना राहा सावधान.

भावी पतीद्वारे ‘गिफ्ट’च्या नावावर युवतीची लाखोंची फसवणूक..

ही घटना आहे नागपूर मधील
ओळख वाढविताना थोडा विचार करून!

नागपूर : ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख झाल्यानंतर होणाऱ्या पतीने पोलंडवरून भावी पत्नीला गिफ्ट म्हणून कार पाठवली. कार घेण्यासाठी गेलेल्या युवतीची ‘कस्टम ड्युटी’च्या नावावर युवकाने ३ लाख ३२ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलंडमधील भावी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारी युवती पुण्यात मेडीकल उपकरण क्षेत्रात काम करते. लग्नासाठी योग्य जोडीदार निवडायचा असल्याने युवतीने ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर नोंदणी केली. तसेच स्वत:बद्दलची माहिती ‘जीवनसाथी’वर अपलोड केली. युवती संदर्भातील माहिती पाहून आरोपी संतोष वाठोडे या युवकाने तिच्याशी संपर्क साधला. स्वत: विषयी माहिती दिली. त्यांच्यात चांगली ओळख झाली आणि लवकरच ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.

संतोषने महिनाभरातच युवतीचा विश्वास संपादन केला. युवती आपल्या जाळ्यात अडकली याची खात्री पटताच संतोषने आर्थिक फसवणुकीची योजना आखली. योजनेनुसार त्याने युवतीला सांगितले की, मी नागपूरचा असून कुटुंबियांसह पोलंडला राहतो.

सध्या युक्रेन आणि रशियात युध्द सुरू असल्याने भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मर्सडीज बेन्झ’ ही कार भारतात पाठविली असून कस्टम विभागात कार अडकली आहे, अशी थाप मारून ‘कस्टम ड्युटी’ची रक्कम ३ लाख ३२ हजार रुपये बँकेच्या खात्यात भरायला सांगितले. युवतीने कशाचाही विचार न करता उपरोक्त रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात भरली. यानंतरही संतोष आणि युवतीत संवाद सुरूच होता. तो नेहमी प्रमाणेच फिर्यादीसोबत बोलायचा. त्यामुळे युवतीला शंका आली नाही.

पैसे मिळाल्यानंतर त्याने युवतीशी संवाद कमी केला. तिला कामात व्यस्त असल्याचे सांगून टाळाटाळ करणे सुरु केले. त्यानंतर फोन उचलणेही कमी केले होते. होणाऱ्या पतीमध्ये झालेला बदल बघून तरुणीला संशय आला. अलिकडे त्याच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. काही दिवसानंतर त्याने फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

tc
x