कॅलिफोर्नियातील सॅन होसे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आले आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन होसे येथील Guadalupe River Park या उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा होता.
या चोरीनंतर सॅन जोसच्या उद्यान विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत आपल्या पुणे शहराने अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या येथील आणि तेथील मराठी जनतेच्या महाराजांविषयीच्या भावनेचा विषय आहे.
यासोबतच त्यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती देखील केली आहे. छत्रपतींचा पुतळा चोरी झाल्याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य शासनाने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी अशी विनंती राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी केली आहे. उद्यानातील हा अश्वारूढ पुतळा चोरी झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केली असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील मागितले आहे.
लवकरात लवकर तपास करण्याची शिवप्रेमींची शिंदे सरकारकडे मागणी..