सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.
पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की, जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची. सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली.
आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही. आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही. पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.
बेसिन पाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही. पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील. खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे.
हे ही वाचा : – आठवणी : आमचाही एक जमाना होता.
आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे. घर सगळयांचं असतं. सगळी जवाबदारी गृहिणीची असं म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.
घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही, खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच.
हे ही वाचा : – मुलीची आई असणं किती भाग्याचं!!
घराला घरपण देण्यासाठी काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल आणि नाती सुध्दा चांगली होतील. थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही ते फायदे मिळतील.