१८९६ भारतात प्लेगची महामारी पसरली. जगातील प्लेगची तिसरी महामारी म्हणून याचा उल्लेख केला जातो. या महामारीमुळे भारतात एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रोग नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांवर अनेक छळ केले.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) ११ मार्च २०२० रोजी अधिकृतपणे कोविड १९ या विषाणूला करोना महामारी म्हणून घोषित केले होते. आज या घटनेला बरोबर तीन वर्षे होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी आजच्याच दिवशी करोना महामारी जगभर पसरल्याचे जाहीर केले होते.
अनेक देशांत किंवा खंडात एखाद्या साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यास त्याला महामारी म्हणून घोषित केले जाते. साथीच्या रोगापेक्षा महामारीचे रोग हे अधिक लोकांना प्रभावित करतात, तसेच यामध्ये मृत्यूचा आकडाही अधिक असतो. कोविड १९ च्या महामारीने भारतीय नागरिकांच्या जीवनात अनेक मूलभूत बदल घडवून आणले. लाखो लोक या महामारीने प्रभावित झाले तर असंख्य लोकांना आर्थिक फटका बसला. यानिमित्ताने आधुनिक भारतात आलेली पहिली आणि मोठी महामारी कोणती होती? त्याचा भारतावर काय परिणाम झाला, याबाबत घेतलेला हा आढावा.
कोविड १९ ही भारतातील पहिली महामारी नव्हती कोणती होती जाणून घ्या
जगभरात पसरलेली ‘प्लेगची तिसरी साथ’ (Third Plague Pandemic) ही भारतात आलेली पहिली मोठी महामारी. १८५५ साली चीनच्या युनान प्रांतातून याची सुरुवात झाली.
(आताची करोना महामारीदेखील चीनच्या वूहान प्रांतातून आली, असे मानले जाते. हे विशेष) WHO च्या अभ्यासानुसार १८५५ ते १९५९ असा दीर्घकाळ या महामारीने जगाला छळले. १९५९ सालापर्यंत प्लेगचा मृत्यूदर वर्षाला २०० च्या खाली आल्यानंतर ही साथ संपत आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र या शंभर वर्षांत जगभरातील १२ ते २५ दशलक्ष लोकांचा या साथीने बळी घेतला. त्यापैकी ७५टक्के मृत्यू (१८९६ नंतर) हे ब्रिटिश अमलाखाली असलेल्या भारतीय उपखंडात झाले. जगभरात पसरलेली पहिली महामारी म्हणून प्लेगचा उल्लेख होतो. हाँगकाँग, त्यावेळचे बॉम्बे (प्रांत), सॅन फ्रान्सिस्को, ग्लासगो आणि पोर्तो सारख्या शहारांमध्ये प्लेगचा प्रसार झाला होता.
प्लेग म्हणजे काय?
भारतात त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीला ‘बुबोनिक प्लेग’ (Bubonic plague) असे म्हणत. यर्सिनिया पेस्टिस या जिवाणूमुळे हा रोग पसरत असे. संक्रमित उंदरांपासून मानवांपर्यंत या जिवाणूचे संक्रमण झाल्यावर प्लेगची साथ पसरायची. प्लेगबाधित पिसूचा मानवी शरीराला दंश झाल्यानंतर दंशाच्या जागी दूषित रक्त सोडले जायचे. यातून प्लेगचा जिवाणू शरीरात प्रवेश करत असे. लसिका वाहिनीवाटे हे जिवाणू लसिका ग्रंथीपर्यंत पोहोचून दाह निर्माण करायचे. फ्लूसारखी ताप-थंडी आणि डोकेदुखी अशी साधारण लक्षणे सुरुवातील दिसत असत. त्यानंतर काखेतील आणि जांघेतील लसिका ग्रंथींना सूज यायची. त्याठिकाणी गाठ तयार होऊन ती फुटल्यानंतर काळसर पूमिश्रित स्राव बाहेर पडायचा आणि काही दिवसांतच रुग्णाचा मृत्यू व्हायचा.
१८९६ च्या नंतर या रोगावर आधुनिक संशोधन व्हायला सुरुवात झाली. तोपर्यंत प्लेगच्या साथीने भारतात हाहाकार माजला होता. जानेवारी १८९७ मध्ये शास्त्रज्ञांनी हा रोग उंदरापासून पसरत असल्याचे शोधून काढले आणि लोकांना याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला. १८९८ मध्ये ही साथ पसरण्यामध्ये जिवाणूंची भूमिकादेखील स्पष्ट झाली
प्लेग भारतात कसा आला?
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, १९ शतकाच्या सुरुवातील भारतातील काही भागांत अतिशय कमी प्रमाणात प्लेगची साथ पसरली. त्या त्या भागातील लोकसंख्येची घनता आणि जिवाणूची स्थिरता यामुळे कमीअधिक प्रमाणात या साथीचा उद्रेक पाहायला मिळाला. १९ व्या शतकात प्लेगपेक्षाही कॉलराची साथ ही भारतीयांसाठी मोठी चिंतेची बाब होती.
प्लेगची तिसरी साथ ही चीनमधून सुरू झाली आणि हाँगकाँगमधून समुद्रामार्गे भारतात पसरली. हाँगकाँगमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर ब्रिटिशांनी तिथून येणाऱ्या जहाजांचे काही दिवस विलगीकरण करण्यास सुरुवात केली. कालांतराने हाँगकाँगमध्ये प्लेगचा उद्रेक कमी झाल्यानंतर तिथून येणाऱ्या जहाजांचे विलगीकरण बंद करण्यात आले, त्यानंतर भारतात १८९६ च्या आसपास प्लेगचा प्रवेश झाला. ब्रिटिश वसाहतीत कलकत्ता, बॉम्बे, कराची या मोठ्या बंदरांमध्ये प्लेगची साथ झपाट्याने पसरली. पुण्यातही प्लेगचा मोठा उद्रेक झाला.
प्लेगची साथ किती भयानक होती?
भारतात पसरलेली ही महामारी शब्दशः भयानक स्वरूपाची होती. ब्रिटिशांना व्यापार आणि जगभरातील स्वतःच्या प्रतिमेची जास्त काळजी होती. त्यामुळे प्लेगच्या साथीची तीव्रता कमी करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. तोपर्यंत संपूर्ण जगालाच प्लेगने विळखा घातला होता. बॉम्बे प्रांताला तर ‘प्लेगचे शहर’ (The City of the Plague) अशी ओळख मिळाली. प्लेगचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत, फेब्रुवारी १८९७ पर्यंत शहरातील साडे आठ लाख लोकसंख्येपैकी ३ लाख ८० हजार एवढी लोक पुन्हा आपल्या मूळ गावी निघून गेले होते. आताच्या करोन महामारीप्रमाणेच त्याकाळातही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले.
प्लेगची साथ पसरण्यास धान्य व्यापारदेखील काही अंशी कारणीभूत ठरला. बाजारातील धान्य कोठारांमध्ये उंदरांची संख्या अधिक असायची. या उंदरांद्वारे जिवाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. १८९७ च्या अखेरपर्यंत प्लेगचा प्रसार उत्तरेकडील राज्यातही मोठ्या प्रमाणात झाला. पंजाब सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात मृत्यू पाहायला मिळाले.
ब्रिटिशांनी प्लेगला कसे तोंड दिले?
प्लेग रोगाबद्दल असलेली अपुरी माहिती, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा स्वतःचा युरोपियन श्रेष्ठत्वाचा दृष्टिकोन याचे प्रतिबिंब प्लेग निवारण योजनांवर दिसून येत होते. ब्रिटिश यंत्रणेने बॉम्बे प्रांतात व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनेक गरिबांची घरे उध्वस्त करावी लागली. आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी लोकांना सक्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रेल्वे स्थानके आणि बंदरांवर वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आली होती. याचा परिणाम काही ठिकाणी हिंसाचारातदेखील झाला.
प्लेगची साथ कधी संपली?
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेली प्लेगची महामारी २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातून नष्ट झाली नव्हती. भारतासाठी हा वाईट काळ होता.
मुंबईत असलेले रशियन-फ्रेंच विषाणुतज्ज्ञ वॉल्डेमार हाफकिन यांनी प्लेगवरील लस प्रथम शोधून काढली. या लसीमुळे ८० टक्के मृत्यू रोखले गेले. पण कोविड १९ लसीप्रमाणेच या लसीमुळे प्लेग रोग होण्यापासून रोखता येत नव्हता. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात उंदीर मारण्याची मोहीम हाती घेतली तेव्हा कुठे महामारीचा प्रभाव हळूहळू कमी झाला.
H3N2 Virus च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाच्या रुग्णातही वाढ; एका दिवसात 524 नवीन रुग्णांची नोंद
संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये हा वेग महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून आला आहे. गेल्या सात दिवसांत कर्नाटकात 584, केरळमध्ये 520 आणि महाराष्ट्रात 512 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूणच, अनेक राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.