मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी होणार आहे.
राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेले पाठ्यपुस्तक आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पथदर्शी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ही योजना इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ किंवा कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पान जोडण्यात येणार आहेत.
या पानांवर विद्यार्थ्यांकडून वर्गात शिक्षक शिकवीत असताना अध्यापन सुरू असताना महत्त्वाच्या मुद्द्याच्या नोंदी होणे जसे की शब्दार्थ, महत्त्वाची सूत्र, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य इत्यादी अपेक्षित असणार आहे.
पाठ्यपुस्तकांमधील ही पाने ‘माझी नोंद’ या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेला हा सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. राज्य सरकारने याबाबतचा जो आदेश जारी केलाय त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शिक्षण आणि शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, पाठ्यपुस्तके आणि वह्या यांच्या वजनाने दप्फतराचे ओझे वाढले जाणे, दफ्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम आणि सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसते.
या सर्व मुद्यांचा विचार करुन शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य परीक्षा मंडळ आणि बालभारतीचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.
या तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या सखोल चर्चेअंती उपोक्त परिणामांचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाच्या वह्यांची पृष्ठे जोडून देण्याविषयीचे सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाले आहेत, असं या निर्णयाच्या आदेशात म्हटलं आहे.
वर्गकार्य, गृहपाठ वह्यांसाठी मुभा :
पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त सराव, वर्गकार्य, गृहपाठ इत्यादींसाठी मुलांनी वेगळ्या वह्या ठेवण्यास मुभा राहणार आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्याने पुस्तकांचे आकारमान, वजन आणि किंमत वाढणार असल्याने या संदर्भात महत्त्वाची कार्यपद्धती अंमलात आण्याची सूचना देण्यात आली आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 10:10 am