नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, द्राक्षाच्या हंगामात सलग दुसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हवामानातील बदलांमुळे, तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहे. मात्र, या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला शेतकऱ्यांच्या वतीने साकडे घालण्यात आले.
This post was last modified on %s = human-readable time difference 8:59 am