बाबा रामदेव यांनी इच्छुक व्यक्तींना संन्यास घेण्याची इच्छा असल्यास पतंजली आश्रममध्ये प्रवेश घेण्याचं आमंत्रित केलं आहे.
२०१२ साली दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून रामदेव बाबा व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. रामदेव बाबांच्या पतंजलीची एकूण उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जातं.
आज देशभरात लाखो लोक पतंजली आणि रामदेव बाबांचं मार्गदर्शन घेतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडित किंवा सभोवताली येणाऱ्या अनेक गोष्टी किंवा वस्तूंपैकी अनेक वस्तूंचं उत्पादन रामदेव बाबांच्या पतंजलीमध्ये होतं. पण आता रामदेव बाबांनी एक विलक्षण आवाहन लोकांना केलं आहे. रामदेव बाबा त्यांच्या पतंजलीमध्ये आता संन्यासी बनण्याचं प्रशिक्षण देणार आहेत!
बाबा रामदेव यांच्या आयुर्वेदिक औषध आणि उत्पादनांचा फार मोठा चाहता वर्ग आज देशात आणि काही प्रमाणात परदेशातही अस्तित्वात आहे. पण आता इच्छुक उमेदवारांना संन्यास शिकवण्याचा निर्णय रामदेव बाबांनी घेतला आहे.
अट अशी फक्त एकच…१२वी पास असणे
ज्यांनी कुणी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे किंवा ज्यांची कुणाची इच्छा असेल, त्यांना प्रशिक्षित केलं जाईल, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पण यासाठी शिक्षणाची अट मात्र घालण्यात आली आहे.
कोणताही इच्छुक उमेदवार किमान १२वी पास असायला हवा, असं या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
येत्या २२ मार्चपासून ३० मार्चपर्यंत पतंजलीकडून संन्यास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये या सर्व इच्छुकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ३० मार्चला महोत्सवाच्या शेवटी यातल्या १०० लोकांना संन्यास दीक्षा दिली जाईल. अर्थात, हे सर्व ‘संन्यासी’ म्हणून घोषित होतील!
२०१८मध्येही रामदेव बाबांनी ९२ पुरुष आणि महिलांना दीक्षा देऊन संन्यासी घोषित केलं होतं.
संन्यासाशिवाय इतरही विषयांचं प्रशिक्षण!
दरम्यान, इथे संन्यासी म्हणून दीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्शनशास्त्र, व्याकरण, वेदशास्त्र आणि संस्कृत साहित्य, बीए-एमए अशा विविध प्रकारचं शिक्षणही घेता येऊ शकणार आहे.
लल्लनटॉपच्या याच वृत्तानुसार पतंजलीमध्ये १२वी पास व्यक्तीला संन्यासी होण्यासाठी साधारण तीन ते चार वर्षं लागतील.
पण जर एखादी व्यक्ती पदवीधर असेल, तर पुढच्या दोन वर्षांमध्ये ते संन्यासी होतात.
This post was last modified on %s = human-readable time difference 5:22 am