एका भारतीय कंपनीने जवळपास २५ हजार लोकांना जॉब देणार असल्याचं सांगितलं आहे
जगभरातील अनेक फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्गात मोठं भीतीचं वातावरणं निर्माण झालं असून आपली नोकरी जाणार की राहणार?
अशा अवस्थेत अनेक कर्मचारी आहेत. याच नोकरकपातीच्या वातावरणात सध्या एक आनंदाची बातमी समोर आली असून या बातमीमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
कारण एका भारतीय कंपनीने जवळपास २५ हजार लोकांना जॉब देणार असल्याचं सांगितलं आहे. अकाउंटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या बीडीओ इंडिया (BDO India) या भारतीय कंपनीने येत्या ५ वर्षांत २५ हजार लोकांना कंपनीत काम करण्याची संधी देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार दरवर्षी जवळपास ५ हजार लोकांना जॉब मिळू शकतात.
२३० कर्मचाऱ्यांपासून केली होती सुरुवात –
BDO इंडिया या कंपनीमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या मागील आठवड्यात ५ हजारांच्या वर गेली आहे. कंपनीचे इंडिया मॅनेजिंग पार्टनर मिलिंद कोठारी यांनी सांगितलं की, बीडीओने २०१३ मध्ये केवळ २३० कर्मचारी आणि २ ऑफिसद्वारे काम करण्यास सुरुवात केली होती.
मात्र, आता कंपनीत ५ हजाराच्या वर कर्मचारी आहेत. कोठारी यांनी म्हणाले की, कंपनी २०२८ या वर्षाच्या अखेरीस, भारतातील ऑपरेशनमध्ये सुमारे १७ हजार तर ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये ८ हजार लोकांची भरती करेल.
BDO कंपनीने १० वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक सेवा क्षेत्रात स्वतःची एक अनोखी आणि मजबूत कंपनी अशी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रावर अर्न्स्ट अँड यंग (EY), डेलॉइट, PwC आणि KPMG सारख्या मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. BDO च्या सरासरी वार्षिक वाढीपैकी ४० टक्के ही ऑडिट विभागातून येते. कंपनीसाठी ऑडिट विभाग दरवर्षी ४० ते ४५ टक्के दराने वाढत आहे.
लहान-मोठ्या कंपन्यांना सर्व्हिस –
मिलिंद कोठारी म्हणतात की, BDO ही आधीच देशातील सहावी सर्वात मोठी ऑडिट फर्म आहे. कंपनीने मध्य-मार्केट ग्राहकांना सेवा देण्यापासून सुरुवात केली. आता ही कंपनी बड्या उद्योग समूहांसह अनेक महापालिकांच्या लेखापरीक्षणाचे कामही करते.
भारतातील ६ मोठ्या ऑडिट कंपन्या येत्या काही वर्षांत खूप वाढतील असंही ते म्हणाले.