नागपूर : बनावट पदव्या वाटपाच्या प्रकरणात आधीच बदनाम झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांबाबत नवा पॅटर्न समोर आला आहे. विद्यापीठाच्या नावावर बनावट पदव्या बनवून २६ जणांना थेट इराकमध्ये नोकरी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराक दूतावासाकडून या पदवींच्या पडताळणीसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारातून ही बाब समोर आली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात इराक येथील दुतावासामधून साकोली येथील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, वर्धेतील बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि शहरातील डॉ.आंबेडकर कॉलेजला पत्र आले. त्यात तेथे नोकरी करणाऱ्या एकूण २६ विद्यार्थ्यांची नावे , त्यांच्या पदव्या व मार्कशीट आहेत का?
असे विचारण्यात आले. यावर महाविद्यालयांनी सांगितले की, आमच्या महाविद्यालयात असा एकही विद्यार्थी शिकत नाही. त्याच्याकडे नोंदणी क्रमांक नसल्याचेही पडताळणीत उघड झाले. यानंतर दूतावासाकडून नागपूर विद्यापीठाला ईमेल पाठवण्यात आला. पुन्हा तीच माहिती विचारली.
या सर्व पदव्या व गुणपत्रकांची विद्यापीठाच्या पदवी व गुणपत्रिका तपासणी विभागाने पडताळणी केली असता, विद्यापीठाचा लोगो व कुलगुरूंची स्वाक्षरी असलेल्या या पदव्या व गुणपत्रिका बनावट असल्याचे आढळून आले.
याची पुष्टी करण्यासाठी, इराकच्या दूतावासातील समन्वयक अब्दुल हमीद यांनी 14 जून रोजी स्वतः विद्यापीठाला भेट दिली. या बनावट पदव्या पाहून त्यांना चांगलाच धक्का बसल्याचे समजते. इराकमधील दूतावासाने प्राप्त केलेल्या पदव्या आणि मार्कशीट 2017, 2019 आणि 2020 मधील आहेत. विशेष म्हणजे 2019 आणि 2020 मध्ये देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. फार्मसीमध्ये सर्वाधिक 24, अभियांत्रिकीमध्ये 2 आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये एक पदवी आहे.
यामुळे तपास लागला
विद्यार्थ्यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी इराकच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे (FRRO) पाठवण्यात आली. या कार्यालयात सादर करण्यात आलेल्या पदव्या व गुणपत्रिका बनावट असल्याचा संशय होता. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाला विचारणा करण्यात आली.