काँग्रेसच्या प्रदेशउपाध्यक्ष आणि आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली.
पाहूया काय म्हणाल्या प्रज्ञा सातव,
नेमकं घडलं काय ?
प्रज्ञा सातव म्हणाल्या की ,मी कळमनुरी तालुक्यात काही गावांच्या दौऱ्यावर होती. या दरम्यान कसगे धावंडा या गावी गाडीतून उतरत होती तेव्हा एक इसम माझ्या गाडीच्या दरवाज्याजवळ आला. त्यामुळे मी पटकन गाडीत बसली आणि दार लावून घेतलं. नंतर माझ्या बॉडिगार्डने त्याला बाजूला केलं. बॉडीगार्डने त्या इसमाला बाजूला केल्यानंतर मी उतरुन नियोजित कार्यक्रमाला गेली. तिथे मी इतरांशी बोलू लागली. तेव्हा हा इसम मागून आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी पटकन सावरली आणि सगळ्यांनी त्याला पकडलं. लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
कोण होता तो व्यक्ती :
संबंधित इसम माझ्या ओळखीचाही नव्हता. बहुतेक तोही मला ओळखत नसावा. पण तेवढ्या गर्दीत तो बरोबर माझा शोध घेऊन तिथे आला. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असू शकतो किंवा कुणीतरी आधीच थांबून ठेवलेलं असेल. कारण मी जाणार असल्याची माहिती कालच त्या गावात दिली गेली होती.
सुरक्षा नव्हती का ?
सुरक्षेत चूक झालेली नाही. माझी बॉडीगार्ड होती. ती माझ्या बाजूला उभी होती. पण समोर बघत होती. पण इसमाने मागून येऊन हल्ला केला. आजपर्यंत कधी असं वाटलं नाही. मी रोजच फिरत असते. त्यामुळे असं कधी होईल वाटलं नव्हतं.
सावित्रीबाई आणि इंदिराजींवरही झाले होते हल्ले :
आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई , इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले.
यावर सुप्रिया ताईंनी दिली प्रतिक्रिया म्हणाल्या ,
विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कसबे धवंडा, ता. कळमनुरी येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे.
माझी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, तातडीची बाब म्हणून प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी. या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे.
This post was last modified on %s = human-readable time difference 7:36 am