एक सत्य कथा चोरीचा मामला…

मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…
तायडे, आम्ही आलोय गं! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. तायडे असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले.

एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ असते त्यातील टोपीवाला बोलला. मी तुम्हाला ओळखलं नाही पण तुम्ही माहेरच्या नावाने हाक मारली म्हणून दरवाजा उघडला संगीताने खुलासा केला. तुमचा धाकटा भाऊ मन्या, जलसंपदा खात्यात नोकरीला असणारा. आमचा लई जिगरी दोस्त आहे. तसेच तुमचा थोरला भाऊ सुधीर. जातेगावला शिक्षक असणारा, आम्ही लहानपणी एकत्रित खेळलोय. बागडलोय.. शिवाय तुमची धाकटी बहीण सुषमा… एका दाढीवाल्याने एवढी माहिती दिल्यावर संगीताचा त्यांच्यावर विश्वास बसला.

ती त्यांना चहा करायला किचनमध्ये गेली. चहाचे कप त्यांच्या हातात दिल्यावर ती म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरची सगळी माहिती बरोबर सांगितली पण गावात तुम्हाला मी कधी पाहिलं नाही! संगीताने आश्चयनि म्हटले. आम्ही एका जागेवर कशाला राहतोय? आमचा येरवड्याला इंग्रजाच्या काळातला मोठा वाडा आहे. आम्ही वर्षातील सात-आठ महिने तिथं काढतो. तिथं आमचं गणगोत बी लई मोठं हाये, तेथून बाहेर पडल्यावर राज्यभर बिझनेससाठी फिरतीवर असतो. टोपीवाल्याने माहिती दिली.

माझे पती नेमके आज सकाळीच परगावी गेले आहेत संगीताने सांगितले. आम्हाला माहिती आहे. कंपनीच्या कामासाठी ते कोल्हापूरला स्विफ्ट या मोटारीने गेले आहेत. त्याच्या गाडीचा नंबरही आम्हाला पाठ आहे. परवा रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार आहेत टोपीवाल्याने माहिती पुरवली.

माझ्या सासूबाईंनी तुम्हाला ओळखलं असतं. त्यांचं पण माहेर आमचंच गाव आहे. पण नेमक्या त्याही आज घरी नाहीत संगीताने माहिती पुरवली. शिरूरला तुमच्या नणंदेकडे त्या गेल्या आहेत. नणंदेचं दुसरं बाळंतपण गेल्याच आठवड्यात झालंय. त्यांची चिमुकली परी फार गोंडस आहे दाढीवाल्याने म्हटले.

तुम्हाला एवढी अपडेट माहिती कशी काय? संगीताने आश्चर्यानं विचारले. अशा माहितीच्या जोरावरच तर आमच्या बिझनेसची बिल्डिंग उभी आहे… दाढीवाल्याने हसत उत्तर दिले. असं म्हणून त्याने सुषमाच्या गळ्याला चाकू लावला.

घरात जेवढी रोकड आणि दागिने असतील, तेवढे मुकाट्याने आणून दे! दाढीवाल्याने असं म्हटल्यावर तिला घाम फुटला. तिने पैसे आणि दागिने त्यांच्या हातात दिले. तुझ्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेला हिऱ्याचा हार कोठंय? तो दे! टोपीवाल्याने दरडावून म्हटले. त्यानंतर तिने तोही दिला. तुझ्या धाकट्या भावाने रक्षाबंधनाला दिलेला ‘आयफोन- १३’ दे! दाढीवाल्याने म्हटले. संगीताने तो फोनही देऊन टाकला.

या दागिन्यांमध्ये राणीहार दिसत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तो घातला होता. तो कोठाय? तिसऱ्याने आवाज चढवत विचारले. संगीताने कपाटातून काढून तोही दिला. जेजुरीला जाताना पंचवीस हजारांची पैठणी नेसली होतीस. ती पण दे! टोपीवाल्याने दरडावले. ती दिल्यानंतर संगीताला रडू यायला लागलं. सासूबाई आणि नणंदेला अंधारात ठेवून, एवढ्या वर्षात आपण दागदागिने व मौल्यवान वस्तू करून ठेवल्या होत्या. एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं.

माझ्याकडचा सगळा पैसा अडका, सोनं नाणं तुम्ही लुटलंत पण माझ्या घरातील एवढी सविस्तर माहिती तुम्ही कशी मिळवलीत? संगीताने विचारलं. तायडे, आम्ही सगळे तुझे फेसबुक फ्रेंड आहोत… तिघांनीही एका सुरात उत्तर दिले.
👆🏻
जरुर बोध घ्यावा.

tc
x