गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला, हैद्राबादमधील व्यक्तीला अटक केली आहे
याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. शिवानंदने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांना याबाब माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
अखेर त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर गुगलच्या वतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात ५०५ (१) (ब) व ५०६ (२) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता दूरध्वनी हैद्राबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बीकेसी पोलिसांचे एक पथक हैद्राबादला रवाना झाले.
मद्यधुंद अवस्थेत दूरध्वनी केल्याची कबुली
मुंबई पोलिसांनी दूरध्वनी करणार्याचा शोध घेतला असता तो हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले. हैदराबाद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. तो पुण्यात गुगल कार्यालयात काम करणार्या एका कर्मचाऱ्याचा भाऊ असून, त्याने मद्यधुंद अवस्थेत दूरध्वनी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 9:40 am