अहमदनगर : नाशिक विभागाच्या विभाजनाच्या घोषणेनंतर आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचही विभाजन करण्यासंदर्भातील हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागात अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नवा विभाग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे
जळगाव पारोला इथं पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदुरबार, या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभागीय आयुक्तालय निर्माण करण्याबाबत स्पष्ट केलं आहे.
पाच जिल्ह्यांच्या या विभागातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा स्वतंत्र विभाग करण्याची ही घोषणा करण्यात आल्यानंतर जर या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभाग झाल्यास नाशिक विभागात केवळ अहमदनगर आणि नाशिक हे दोनच जिल्हे उरणार आहेत.
अशातच मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांकडून सातत्याने विभाजनाची मागणी शासन दरबारी केली जात आहे. बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे.
अहमदनगरच्या उत्तरेतील श्रीरामपूर, राहता, शिर्डी, संगमनेर तालुक्यांचा एक जिल्हा व्हावा, अशी मागणी प्रलंबित आहे. तर नाशिकमध्ये मालेगावचं विभाजन करुन जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र विभागाच्या घोषणेनंतर आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या विभाजनाचा मार्ग मोकळा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
This post was last modified on %s = human-readable time difference 11:53 am